Ad will apear here
Next
‘भिकेडोंगरी’चो भेळो
1

पावसाळ्याचे दिवस होते. आमच्या जंगलात जांभूळ आणि फणस लागवडीचा कार्यक्रम सुरु होता. दूर पश्चिमेकडील डोंगरावर कोसळणारा पाऊस आमच्या डोंगरावर पोहोचेपर्यंत ५ - ६ मिनिटांचा वेळ लागतो. समोरून येणाऱ्या पावसाचा आवाज ऐकला आणि आमच्या दिशेने येणारा एखादा ढग दिसला की मोठ्याने आरोळी द्यायची ‘पाऊस इलो रे sss.” मग खाली गेलेला माणूस वर चालत येई पर्यंत अर्धा भिजयचाच. धुक्याच्या दुलईत शांत पहुडलेल्या जंगलावर पुन्हा थेंबांचा आवाज सुरु व्हायचा आणि पाहता पाहता मागचे सारे अरण्य दणाणून सोडायचा. असाच एक दिवस याच डोंगरावर जंगलाकडे पाठ करून बसलो होतो. पाऊस आला म्हणून वरती आलेल्या शंकर मामांना सहज विचारलं, “गोठोस गावची वेस खय पर्यंत आसा ओ? हयसून दिसता काय?” बाकीच्या सर्व वेशींची सविस्तर माहिती दिल्यावर पश्चिमेकडे बोट करून आमचे शंकर मामां म्हणाले “हुयत्या ‘भिकेडोंगरी’ च्या पलीकडे वाडोस गाव सुरु होतां. पाऊस गेलो काय बगा, केदोतरी भेळो आसा थयसर.” पावसाची सर गेल्यावर काही मिनिटांपुरती माझी नजर ‘भिकेडोंगरी’वर गेली.

अवाक होऊन मी त्या समोरच्या डोंगरावर पाहत राहिलो. माझ्यापासून साधारण दीड ते दोन किलोमीटर लांब असलेल्या डोंगरावर अगदी ठिपक्या-ठिपक्या प्रमाणे दिसणाऱ्या त्या रानातील अन्य कोणत्याही झाडांच्या तुलनेत अत्यंत ठळकपणे नजरेत भरणारा, अतिप्रचंड अर्धवर्तुळाकार पर्णशंभार माझ्या नजरेस पडला. वाह! तेव्हाच ठरवलं की कधीतरी मुद्दाम वेळ काढून त्या वृक्षाला भेटून यायचं. या सदिच्छाभेटीचा आज योग आला. आज शंकर मामांचा मुलगा सोबत होता. चला तर मग !

डोंगर चढायला सुरुवात झाली, गर्द झाडीतून, बांबूच्या बनातून वाट काढत आम्ही चालू लागलो. उत्सुकता शिगेला पोहोचली होती. खरंच, केवढा असेल न हा वृक्ष. भेळो, अर्थात बेहडा Terminalia bellirica (Gaertn.) Roxb. Family: Combretaceae संस्कृत मध्ये याला ‘बिभीतक’ किंवा ‘अक्ष’ असेही नाव आहे. अत्यंत औषधी गुणधर्म असलेल्या या वृक्षाच्या बिया ‘त्रिफळाचूर्ण’ या आयुर्वेदिक औषधात वापरल्या जातात. चरक संहितेत म्हटल्याप्रमाणे तल्लख बुद्धीसाठी, निरोगी आयुष्यासाठी बेहडा अत्यंत गुणकारी आहे. पूर्वी शाळकरी मुले या झाडाच्या बिया फोडून आतला गर खात असत. गावात देवदेवसकी आणि भूताखेतांचे विषय आले की या झाडांची चर्चा असते. आम्ही ज्या वृक्षाला भेटायला चाललो होतो तोही कदाचित याच भूत-प्रेत गोष्टींमुळे अजून एवढी वर्ष दूर जंगलात गावाच्या वेशीवर जिवंत उभा राहिला होता काय? कोण जाणे.

एक वळसा मारून थोड्या मोकळ्या जागेत आलो आणि डाव्या हाताला पाहिलं. बास! स्तब्ध होऊन पाहत राहिलो. एवढा प्रचंड महाकाय वृक्ष. किती वयस्कर असेल नं? अधून मधून येणारी वाऱ्याची झुळूक आणि लाखो पानांच्या सळसळीतून क्षणागणिक निर्माण होत असलेलेल्या संगीत रचना शब्दात मांडता येत नाहीत. जवळ गेलो. पायातील चपला काढून या वृक्षाला नमस्कार केला. २ - ४ मिनिटं फक्त फांद्या आणि पानाचा विस्तार निशब्द होऊन पाहत होतो. ज्ञानोबा माउलींच्या शब्दात सांगायचं तर “अतिंद्रिय परी भोगविना इंद्रीयांकरवी” किंवा ज्येष्ठ लेखिका कवयित्री शांताबाई शेळके यांच्या शब्दात “ते एक झाड आहे, त्याचे माझे नाते; वाऱ्याची एकच झुळूक आम्हा दोघांवरून जाते”. अद्वैत याहून वेगळ काय असेल!

माझ्या प्राथमिक अंदाजाप्रमाणे साधारण दोनशे वर्षांचा हा वृक्ष असावा. कदाचित जास्तही असेल. या वृक्षाचा एकूण विस्तार साधारण २३०० चौरस फुट म्हणजे साधारण ३ गुंठे. ६ फुट उंचीच्या तीन माणसांच्या कवेत न मावणाऱ्या या वृक्षाचा व्यास साधारण ७ ते ८ फुटांच्या दरम्यान असावा, जमिनीपासून साधारण ७ फुट उंचीवर मोजल्यास, कारण याची पात्याप्रमाणे उंच उभी आणि खाली लांब पसरलेली वप्रमुळे (इंग्रजीत buttress roots) झाडाची वेढी सुखासुखी मोजू देत नाहीत! जमिनीपासून साधारण २०-२५ फुटांवर पहिली फांदी. एकूण उंची किमान ६० फुट असावी. एका फोटोत संपूर्ण झाड मावत नाही. क्या बात है!

मला नेहमीच अशा महाकाय वृक्षांना भेटायला जाताना “लगजा गले...” गाण्यातलं “शायद फिर इस जनम में मुलाकात हो न हो” आठवतंच. आणि भेटायच्या आधीच डोळ्यात पाणी येतं. असे वृक्ष संवर्धित करण्याच्या दृष्टीने काहीतरी ठोस पावले उचलण्याची आज गरज आहे. कोकणात जे काही जुने वृक्ष आज खाजगी जमिनींवर उभे आहेत त्यातील ९५% देव-देवस्की आणि भूत खेत किंवा अन्य काही गोष्टींची भीती असल्यामुळे किंवा सामायिक जमिनींच्या वाद विवादामुळे तरले आहेत. येथील खेड्यातील सामान्य लोक जुन्या झाडांप्रती भावनिक असतात, सहसा पान फांद्या तोडू देत नाहीत हे जरी खरे असले तरी त्या शेतकऱ्यास देखील या तीन साडेतीन गुंठे जागेतून असे वृक्ष राखून शेती बागायती पिकांच्या लागवडीपेक्षा अधिक आर्थिक नफा मिळवून कसा देता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यास केवळ भावनिक आवाहन करून चालत नाही कारण त्याचे हातावर पोट असते. वन विभागाच्या संरक्षित जंगलाबाहेर खाजगी जमिनींवर, असलेली जैवविविधता कुणाच्याही केवळ भावनिक आवाहनावर टिकू शकत नाही. त्याला पर्यावरण पूरक अर्थकारणाची जोड आवश्यक आहे.

अशा झाडांना राष्ट्रीय वारसा वृक्ष अर्थात National Heritage Trees घोषित करून त्या जमीन मालकास विशेष आर्थिक प्रोत्साहन देणे तसेच अशा ठिकाणी पर्यावरण पूरक पर्यटन वगैरे सुरु करून त्याला अधिकचे चार पैसे कसे मिळतील असाही विचार करणे अत्यावश्यक वाटते. तशी एखादी लोकचळवळ उभारणे काळाची गरज आहे. अन्यथा येत्या काळात अशा महाकाय वृक्षांच्या ठिकाणी काजू, रबर किंवा अन्य नगदी पिकांच्या बागा दिसल्यास किंवा आजच्या भाषेत अन्य विविध “विकास कामे” उभी राहिलेली दिसल्यास “अरेरे, पूर्वी असं होतं, तसं होतं” वगैरे म्हणत अश्रू ढाळत, रडगाणं गाण्यापलीकडे काही उरणार नाही.

- मिलिंद जोशी

2
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IXTCCO
Similar Posts
'साळगाव'चा हेळेश्वर कुडाळमधील साळगाव-सुतारवाडी जवळ असलेला हा बेहड्याचा महाकाय वृक्ष "कोणे एके काळी हेळेश्वर जाहला".
सातवीण - Alstonia scholaris (L.) R. Br. कोकणात दिवाळीत ‘चावदिसाक’ सकाळी तुळशी वृंदावनासमोर ‘गोविंदा ss, गोविंदा sss, गोssविंदा..’ म्हणंत हिरव्या गार बुळबुळीत कारीट्याचा वध करून गोड-धोड खाण्याची इच्छा घेऊन घरात जाल तर आज्जी पेल्यात एक अत्यंत कडू करड्या रंगाचा विचित्र रस घेऊन वाटेत उभी असायची. मग या पेल्यातील एक तरी घोट घेतल्याशिवाय गत्यंतर नसायचं
रोपांना आधार देताना... वृक्षांची बियांपासून केलेली रोपे झरझर वाढतात. खालील एका फोटोत आमच्या बागेत लावलेले फणसाचे एक रोप आहे जे १ वर्षात ९ फूट उंच वाढले आहे. अशा उंच रोपांना आधार देण्याची गरज असते अन्यथा मोठ्या वाऱ्यात अशी झाडे वाकडी होतात किंवा मोडतात देखील आणि अशा वाकड्या झाडांकडे दुर्लक्ष केल्यास ती तशीच वाकडी होऊन वाढू लागतात
सुरंगीचो वळेसार... लहान नाजूक पाकळ्यांची सुगंधी फुले बऱ्याचदा स्त्रीलिंगी तर काहीशी मोठी फुले पुल्लिंगी संबोधली जातात उदा. जाई, जुई, अबोली वगैरे किंवा चाफा, तगर, गुलाब वगैरे. यात अनेक अपवादही आहेत. सुरंगी अर्थात Mammea suriga (Buch.-Ham. Ex Roxb.) Kosterm. (Family: Calophyllaceae) या प्रजातीत कित्येकदा नर आणि मादी झाडे वेगळी वेगळी असतात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language